अवकाळी पावसाची हजेरी; ‘या’ जिल्ह्यांना आजही ऑरेंज अलर्ट!

हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग चौथ्या दिवशी दमदार हजेरी लावली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून विदर्भात उष्णतेची लाट आल्याचे चित्र असतानाच आता अवकाळी पावसाने दमदार एन्ट्री केल्याने तापमानात अचानक मोठी घट झाली आहे. तर ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने एंट्री केल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच आजही विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह, 30-60 प्रति तास सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आज विदर्भातील वाशिम, यवतमाळ, चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि उर्वरित विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. आजही अनेक भागात पावसाची शक्यता नागपूर हवामान विभागाने वर्तवली होती, त्याप्रमाणे आज पहाटेपासून नागपूरसह विदर्भातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळत असल्याचे चित्र आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली होती. त्यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, अलिकडे झालेल्या अवकाळी पावसामुळं वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकडया पासून सुटका झाली आहे. तर दुसरीकडे या अवकळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना झाल्याचेही चित्र आहे.