सांगोला तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई असते हे सर्वत्र जगजाहीर आहेच. सागोल्यातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. चालू वर्षी कमी पर्जन्यमान व भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे सांगोला तालुक्यातील गाव पातळीवरील सर्व योजनांच्या विहिरी कोरड्या पडू लागल्यात तर भूजल पातळी खोलवर गेल्यामुळे गाव, वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण होऊ लागली आहे.
अशातच ग्रामपंचायतीकडील ग्रामीण पाणीपुरवठा योजनाही पाण्याविना बंद पडू लागल्याने पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव आधार असलेल्या ८२ गावांच्या शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेकडे पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी दिवसेंदिवस मागणीत वाढ होत आहे. सांगोला तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची वरदायिनी असणाऱ्या एकमेव शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून ८२ पैकी ३२ गावांना त्यांच्या मागणीनुसार दीड लाख लोकसंख्येला व ४ सहकारी संस्थांना सरासरी ३० लाख लिटर पाणीपुरवठा सुरू आहे तर शिरभावी योजनेतून १० टँकरद्वारे २० खेपा करून वाडी- वस्तीवरील नागरिकांची तहान भागवली जात आहे.
१२ ग्रामपंचायतीकडून शिरभावी योजनेकडे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान मार्च २०२४ अखेर योजनेतील थकबाकीदार गावे व संस्थाकडे सुमारे १ कोटी ३१ लाख ६३ हजार रुपये थकबाकी येणे असल्याचे उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर माने यांनी सांगितले.
शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून – मानेगाव, डोंगरगाव, लक्ष्मीनगर, घेरडी, बामणी, सावे, देवळे मांजरी, धायटी, गोडसेवाडी, जवळा, बुरंगेवाडी, सोनंद हणमंतगाव, अजनाळे, संगेवाडी, मेथवडे, कटफळ, वाकी शिवणे, नरळेवस्ती, आचकदाणी, सोनलवाडी बागलवाडी, महूद बुद्रुक, वाणीचिंचाळे, आलेगाव, मेडशिंगी, लोटेवाडी सातारकरवस्ती, वाकी-घेरडी, कडलास आगलावेवाडी, यलमर मंगेवाडी अशा ३२ गावातील दीड लाख लोकसंख्येला त्यांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा सुरू आहे.