सांगोल्याजवळ वाहनांची धडक बसून दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू

सांगोला मिरज रस्त्यावर, सांगोल्याजवळ मालवाहतूक करणाऱ्या दोन वाहनांची सामोरा समोर धडक बसून झालेल्या अपघातात दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाला. तर अन्य नऊजण जखमी झाले. फिक्कट गाडीतून डाळिंबाची वाहतूक केली जात होती. तर टेम्पोत ऊसतोड मजूर होते. सर्व मृत आणि जखमी सांगोला तालुक्यातील गौडवाडीतील राहणारे आहेत. हा अपघात बुधवारी रात्री ९:३० च्या सुमारास सांगोला-मिरज रोडवर झाला. बाबूराव महादेव गोडसे (वय ४२) व एकनाथ सोपान गडदे (५३, दोघेही रा. गौडवाडी, ता. सांगोला) अशी मृतांची नावे आहेत. सुजाता बापू आलदर (३५), रेश्मा संजय ऐवळे (३०), विमल भारत कांबळे (५५), दामू राजाराम शिंगाडे (६०), मैनुहुद्दीन गुलाब मुलानी (७०), गोरख लिंगू सरगर, हर्षद हनुमंत काटे (१८) हनुमंत श्रीरंग काटे (७०), भारत विष्णू कांबळे (६५), गणपत दत्तू आलदर (५०,सर्वजण रा. गौडवाडी, ता. सांगोला) अशी जखमींची नावे आहेत. 

गौडवाडी (ता सांगोला) येथील पाच महिला व १२ पुरुष ऊस तोडणी कामगारांनी क्लास, ता. सांगोला शेतकऱ्यांचा ऊस तोडणी करून एमएच १० के ६७५३ या टेम्पोमधून सांगोल्याकडून मिरज रोडने गौडवाडी घराकडे निघाले होते, तर एखतपूर येथून पीकअप (एमएच ४५, एएफ- ६७८५) मध्ये डाळिंब भरून मिरज रोडने सांगोला येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी निघाले होते. वाटेत दोन्ही वाहनांची सांगोल्यापासून एक किलोमीटर अंतरावर जोराची धडक होऊन हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर टेम्पो फरपटत जाऊन उजव्या बाजूला उलटला. त्यामुळे टेम्पोतील उसाच्या वाड्याखाली ११ ऊसतोडणी कामगार अडकले होते. अपघातानंतर बराच वेळ वाहतूक खोळंबली होती.