अयोध्येतील रामजन्मभूमीत प्रभी श्री रामाचे मंदिर निर्माण झाल्यानंतर आज पहिलीच रामनवमी आहे. त्यामुळे रामभक्तांसाठी हा सोहळा उत्साहाचा आहे. प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र नवमीला दुपारी बारा वाजता झाल्याचं म्हटलं जातं आणि त्यामुळेच अयोध्येत देखील दुपारी 12 वाजता रामजन्माचा सोहळा रंगला. दुपारी 12 वाजता रामलल्लाच्या भाळी सूर्यतिलकाची मोहोर (Ayodhya Ram Navami Surya Tilak) उमटली आहे.
चार मिनिटं रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक झाला आहे, ही नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी भाविकांची अयोध्येत गर्दी जमली होती. अयोध्येच्या मंदिरात अंबाबाईच्या मंदिराप्रमाणे सूर्यकिरणं दरवाज्यातून नाही, तर ती घुमटातून आली. रामजन्म, म्हणजे ठीक मध्यान्हाच्या वेळी दुपारी 12 वाजता सूर्यकिरणं रामललाच्या माथ्यावर पडली. घुमटाच्या गवाक्षातून येणाऱ्या किरणांची दिशा अचूक ठेवण्यासाठी ऑप्टोमेकॅनिकल सिस्टिमचा आधार घेतला गेला.
या सिस्टिममध्ये अभिषेकासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे – दोन आरसे, एक पितळेचा पाईप आणि तीन लेन्सेसनी.सगळ्यात मोठी लेन्स मंदिराच्या छतावर बसवली गेली होती. ती रिफ्लेक्ट होऊन ही किरणं पहिल्या आरशावर परावर्तीत केली गेली आणि मग पितळेच्या पाईपमधल्या पुढच्या दोन लेन्समधून प्रवास करत ही किरणं रामललाच्या कपाळावर पडली.