कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरिएंटच्या पुन्हा एकदा देशासमोर संकट निर्माण केलंय. देशात JN.1 व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नव्या JN.1 चे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह केसचे नमुने केंद्राच्या प्रयोगशाळेत पाठवण्यास सांगितले आहेत. कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे लसीच्या चौथ्या डोसची आवश्यकता आहे का? याची विचारणा होत आहे. आवश्यकता असेल तर चौथा डोस कधी मिळणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेता सरकारने एक मोठी माहिती दिली आहे.
थंडीसोबतच कोरोनानेही देशासमोर अडचणी निर्माण केल्या आहेत. JN.1 व्हेरिएंट हे Omicron चा उपप्रकार आहे. सिंगापूर येथे हा JN.1 प्रथम आढळून आला. तेथून तो चीन, अमेरिका, भारत आदी ४० हून अधिक देशात पसरला. डब्ल्यूएचओने याला धोकादायक म्हटले आहे. तसेच याला ‘इंटरेस्ट ऑफ व्हेरिएंट’ असे नाव दिले आहे. ओमिक्रॉनच्या याच JN.1 नव्या व्हेरिएंटशी लढण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने नवी लस तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
भारत SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) चे प्रमुख एन. के. अरोरा यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘देशात JN.1 प्रकाराची उपस्थिती निश्चितच चिंताजनक आहे, ६० वर्षांवरील व्यक्तींना श्वास घेण्यात अडचण येत असेल. तसेच ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांनी तिसरा डोस घेतला नसेल तर सावधगिरीचा उपाय म्हणून तिसरा डोस घ्यावा. परंतु, सध्या तरी कोरोना लसीच्या चौथ्या बूस्टर डोसची गरज नाही. लोकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी आणि कोरोना नियमाचे जास्तीत जास्त पालन करावे असा सल्ला दिलाय.