देशात सात टप्प्यात मतदान होत आहे. त्यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी म्हणजे दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छूकांची धावपळ सुरू आहे. तर महायुती व महाविकास आघाडी व इतर पक्षांच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केले असून उमेदवार आता प्रचारावर जोर देत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामध्ये बहुंताशी उमेदवार हे वैयक्तीक भेटीगाठीवर भर देत आहे. तसेच विविध छोट्या मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावत मतदारांशी संवाद साधत आहे. आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात होणार आहे. येणाऱ्या १५ ते २० दिवसामध्ये एकमेकांवर टिका, आरोप केले जाणार आहे. त्यासाठी विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी सेलीब्रेटीच्या सभेचे आयोजन करणेत येणार आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने मोठ्या सभांसाठी तसेच कॉर्नरसभासाठी ठिकाणाची यादी प्रसिध्द केली आहे.
मोठया सभांसाठी शहरातील श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौक, संत नामदेवभवन मैदान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मैदान, शहापूर चौक, थोरात चौक, वंदे मातरम क्रीडांगण वर्धमान चौक, जवाहरनगर पाण्याच्या टाकीजवळ या सात ठिकाणी जागा निश्चित केली आहे.
जाहीरसभांसाठी सात हजार रूपये तर कॉर्नरसभासाठी एक हजार रूपये शुल्क आकारली जाणार आहे. तसेच शहरातील विविध शंभर ठिकाणची यादी कॉर्नरसभासाठी तयार करण्यात आली आहे.
शहरातील मतदान आपल्या पदरी पडावे यासाठी सर्वच पक्षाचे नेतेमंडळी व उमेदवार प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर प्रशासन सुध्दा मतदार जागृती, त्याचशिवाय जास्तीजास्त मतदान होण्यासाठी तयारीला लागले असून मोठ्या सभा, कॉर्नर सभासाठी जागा भाडे निश्चित केले असून त्यापध्दतीने राजकीय पक्ष आपआपल्या पध्दतीने तयारीला लागले
आहेत.