इचलकरंजी पथविक्रेता निवडणुकीमध्ये भाजप, काँग्रेस, माकपची सरशी

सध्या चालू असलेल्या राजकीय वातावरणात नुकताच झालेल्या पथविक्रेत्याची चुरशीने निवडणूक पार पडली. इचलकरंजी शहर पथविक्रेता समिती निवडणुकीसाठी ८४२ मतदारांपैकी ६०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण आठ जागेपैकी इचलकरंजी शहर फेरीवाला विकास आघाडीच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. अनुसूचित जमाती प्रवर्गातील जागेसाठी एकही अर्ज उपलब्ध न झाल्याने ती जागा रिक्त राहिली आहे.

उर्वरित पाच जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात उतरले होते. काँग्रेस, भाजपा व माकपची इचलकरंजी शहर फेरीवाले विकास आघाडी विरुद्ध फळ विक्रेत्यांचे नेते शफीक बागवान यांच्या नेतृत्वाखालील आघाडी अशा दोन आघाडींच्या उमेदवारांमध्ये चुरशीने निवडणूक पार पडली.

त्यामध्ये भाजपा कॉंग्रेस व माकप प्रणित इचलकरंजी शहर फेरीवाले विकास आघाडीच्या पाचही उमेदवारांनी बाजी मारत विजय खेचून आणला. तर विरोधी शफीक बागवान यांच्या आघाडीला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. निकाल निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर यांनी जाहीर केला. शहर पथ विक्रेता निवडणुकीमध्ये भाजपा, काँग्रेस व माकप प्रणित विकास आघाडीचा दणदणीत विजय झाला. पाचही जागा जिंकत फेरीवाला समितीवर निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे. विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.