शिंदे पुन्हा कोल्हापूर दौऱ्यावर……

शिंदेसेनेच्या वाट्याला आलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांतील दोन्ही उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे पाठबळ वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरमध्ये दोन दिवस तळ ठोकणार आहेत. येत्या शनिवारी, रविवारी ते येण्याची शक्यता आहे. यात शनिवारी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा अर्ज भरण्याआधी शिंदे दोन दिवसांसाठी कोल्हापूरला आले होते.

दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचनंतर ते मुंबईला गेले होते. यावेळी त्यांनी नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या घरी भेटी दिल्या. अर्ज भरण्यासाठी शिंदे १५ एप्रिलला कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार महादेवराव महाडिक आणि समरजित घाटगे यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या होत्या. महाडिक यांच्या घरात त्यांनी विविध मान्यवरांच्या स्वतंत्र आणि एक, दोघांना एकत्र घेऊन अशा बैठका केल्या.

या भेटीनंतर हे सर्व जण चांगल्या पद्धतीने सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. अजूनही काही दुरुस्त्या बाकी आहेत. त्यामुळे शिंदे पुन्हा कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. यामध्ये प्रमुख नेते मंडळी, सहकारी संस्थांचे प्रमुख, उद्योजक यांच्या ते भेटी घेण्याची शक्यता असून, याच गाठीभेटींच्या माध्यमातून महायुतीच्या मागे बळ उभा करण्याचे त्यांचे नियोजन आहे.