राज्यात महिला-मुलींचे आयुष्य सुरक्षित आहे का, असा प्रश्न सध्या पडू लागला आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवरून महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून दररोज अत्याचाराच्या भयानक घटना उघडकीस येत आहेत. बदलापूरमधील लहान मुलींवरील अत्याचार असो किंवा अंबरनाथमध्ये रिक्षा चालकाने शाळकरी मुलीचा केलेला विनयभंग… डोक्यात तिडीक जाणाऱ्या हे भयानक प्रकार समोर येत असतानाच आता पुण्यातही एक अतिशय दुर्दैवी घटना घडल्याचे उघड झालंय. विद्येचे माहेरघर अशी ओळख असणारं पुण सध्या गुन्ह्यांमुळेच जास्त गाजतंय. काही दिवसांपूर्वीच अल्पवयीन मुलींवर ज्येष्ठ नागरिकांनी अत्याचार केल्याची प्रकरणं उघडकीस आली होती, त्यामुळे पुण हादरलेलं असतानाच आता अशीच एक वाईट घटना घडलीये.
पुण्यात एका शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचर करण्यात आला असून नात्यातील एका नराधम तरूणानेच हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. शाळेतील तक्रार पेटीतून या भयानक कृत्याचा उलगडा झाला असून त्यामुळे संपूर्ण शाळाच हादरली आहे. पीडित मुलीच्या आईला या घटनेसंदर्भात समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र त्या नराधमाला शिक्षा मिळालीच पाहिजे, या निर्धाराने त्या मुलीच्या आईने बंडगार्डन पोलीस स्थानक गाठून तेथे सर्व प्रकार कथन करत फिर्याद दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून 21 वर्षीय तरूणाला अटक केली आहे, धक्कादायक गोष्ट म्हणजे तो तरूण त्या मुलीच्या नात्यातीलच आहे. त्याच्याविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.