शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या इयत्ता पहिली आणि दुसरीची पुस्तकं बदलली जाणार आहे.आताच्या पुस्तकांचं 2024-25 हे शेवटचं शैक्षणिक वर्ष असणार आहे. 2025-26 या शैक्षणिक पासून पहिली आणि दुसरीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होईल. विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं दिली जाणार आहे. बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे
शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी बालवाटीका, बालवाडी, अंगणवाडीसाठी प्रस्तावित नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचं प्रस्तावित आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 (जून 2024) हे इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष असणार आहे. त्यामुळे इयत्ता पहिली -दुसरीच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष 2023-2024 (जून 2023) पासून पथदर्शी स्वरूपात इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट असलेली एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके एकूण ४ भागात उपलब्ध करून दिली आहेत. या वर्षीसुध्दा तशाच पद्धतीची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांची एकूण 4 भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. तसेच वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करून दिली जातील, अशी देखील माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे.