हुपरीत मोबाईल दुकान दुकान फोडले! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अलीकडच्या काळात गुन्हेगारी प्रकारात वाढ झालेली पहायला मिळत आहे. कुठे हाणामारी तर कुठे चोरी हे सत्र चालूच आहे.
गजबजलेल्या हुपरी येथील जुन्या बसस्थानकाजवळ हुपरी रेंदाळ रोडवर चोरीची घटना घडल्याने हुपरी शहरात खळबळ उडाली आहे. हुपरी जुन्या बसस्थानकाशेजारी नेक्स्ट स्टेप या दुकानाचे मागील दाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चांदीचे क्वॉइन व मोबाईल सह ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

गजबजलेल्या सुभाष चौकात ही चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. चोरट्यांनी पाठीमागच्या दाराने कुलूप तोडून आत प्रवेश केला व आतील १२ मोबाईल हँडसेट व मेमरी कार्ड व इतर साहित्य किंमत ४६ हजार, स्मार्टवॉच १० हजार व ४०० ग्रॅम देवदेवतांचे चांदीचे कॉइन १० नग किंमत १५ हजार असा एकूण ७१ हजार रुपयांहून अधिक मुद्देमाल लंपास केला आहे. विपुल शिवाजी घोडेस्वार (वय ३१ रा. विठ्ठलवाडी रेंदाळ) यांच्या फिर्यादीवरून हुपरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक तपास पोहेकॉ उत्तम सावरतकर करीत आहेत. आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी व पाकिट मारीच्या घटना सातत्याने घडत आहेत, चोरट्यांना पोलिसांचे भय राहिले नाही तेव्हा हुपरी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी जनतेमधून होत आहे.