लोकसभा निवडणुकीत महायुतीचा एकजुटीचा निर्धार!

मागील काळातील संघर्ष आणि आपसातील मतभेद मिटवून एकजुटीने लोकसभा निवडणुकीस सामोरे जाण्याचा निर्धार महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला.महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय मेळावा येथील महासैनिक दरबार येथे झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वगुरू होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी एकदिलाने काम करण्याचा मनोदयही यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम गरिबांना न्याय देणारे आहे. मोदी यांचे हे काम जनतेपर्यंत घेऊन गेले पाहिजे.

भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांचे सरकार एकदिलाने काम करीत आहे. नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये मतभेद नाहीत हा संदेश देण्यासाठी राज्यात एकाचवेळी सर्वच ठिकाणी असे मेळावे घेतले आहेत. राजीव गांधी यांनी केलेल्या एक रुपयांतील केवळ 18 पैसे थेट गावात पोहोचतात या वक्तव्याची आठवण करून देत मुश्रीफ म्हणाले, मोदी सरकारने थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे धोरण आखल्याने थेट लाभार्थ्यांना पूर्ण पैसे मिळण्यास मदत झाली आहे.

राज्यातील 48 जागा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी करून मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करूया, असे अवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.