सांगली लाेकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा काॅंग्रेस पक्षाला निवडणूक न लढता हातावर हात ठेवून बसावे लागत आहे. त्याच्या मागे कटकारस्थानांचा भाग असल्याचे आराेप काॅंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाेरदार करण्यात आले.
त्या कटाचे बळी मात्र सांगली जिल्ह्यातील काॅंग्रेस पक्षाला देण्यात आले. या तीव्र प्रतिकार करण्याच्या राजकीय हिंमत दाखविण्यात काॅंग्रेसचे राज्य पातळीवरील नेते कमी पडले तसाच दाेष स्थानिक नेत्यांना आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुखांनादेखील दिला पाहिजे.
याउलट काेल्हापुरात काॅंग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सलग दाेन निवडणुकीत आपल्याला हवी तशी भूमिका घेत काॅंग्रेसचा दबदबा वाढविला. तीस वर्षे सातत्याने लढून शिवसेनेने मागच्याच निवडणुकीत यश संपादन केले असताना त्यांनाही नमते घेण्याचा डाव टाकला. शाहू छत्रपती यांच्या उमेदवारीने सारेच पक्ष गारद झाले आणि त्या पक्षांना शाहू छत्रपतींना न्यू पॅलेसवर येऊन पाठिंबा जाहीर करावा लागला.
मागील निवडणुकीत सहा महिन्यांपासूनच तयारी करीत सतेज पाटील यांनी काॅंग्रेसची ताकद शिवसेनेच्या मागे उभी केली. त्या माेहिमेला ‘आमचं ठरलंय’ अशी टॅगलाईन दिली हाेती. काेणी काही म्हणाे, आमचं ठरलंय त्यात आता बदल नाही. यावर आघाडी धर्म पाळण्याचा काेणी सल्ला दिला नाही. काॅंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार झाली नाही. पक्षविराेधी कारवाईचा मुद्दा उपस्थित झाला नाही. सांगलीच्या विद्यमान काॅंग्रेस नेतृत्वाचा अनुभव कमी पडला.