सध्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाचे प्रचार दौरे सुरु आहेत. जास्तीत जास्त मते मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील (आबा) सरूडकर यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील गावात प्रचार दौरा केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंतराव पाटील, युवा नेते प्रतिकदादा पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील (आबा) सरूडकर यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील तुजारपूर, गाताडवाडी, दुधगाव आदी गावांचा प्रचार दौरा केला. ‘मोदी सरकार शेतकरी विरोधी असून आपले प्रश्न संसदेत मांडणारा हक्काचा खासदार म्हणून सत्यजित पाटील (आबा) यांना दिल्लीला पाठवूया, असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी कार्यकर्ते व मतदारांना केले. आ. जयंत पाटील म्हणाले, मोदी सरकारने काही बड्या उद्योगपतींना २५ लाख कोटींची कर्जात सवलत दिली. मात्र त्यांच्याकडे शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यास, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविण्यास पैसे नाहीत.
जीएसटी आणि बँकेच्या सेवा करातून जनतेची कोट्यवधी रुपयांची लूट करून त्यातून हा ६ हजारचा तुकडा परत केला जात आहे. त्यांचा हा डाव आपण समजून घ्यायला हवा. सत्यजित पाटील म्हणाले, मोदी सरकारने गेल्या १० वर्षात शेतकऱ्यांना काय दिले? याचा आपण गंभीरपणे विचार करावा. समाजातील कोणताही घटक समाधानी नाही. फक्त घोषणा आणि जाहिरात केली जात आहे. आपण त्यास फसू नका.