लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रथमच दिव्यांग मतदान केंद्राचा समावेश केला आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या पुढाकाराने प्रथमच चार नवीन मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे.
पिंक पोलिंग स्टेशन हे देशभक्त बाबासाहेब खंजिरे नाईट कॉलेज पूर्व-पश्चिम इमारत, पूर्वेकडून खोली क्र. ८ मध्ये असणाऱ्या केंद्र क्र. १३० मध्ये उभारण्यात येणार आहे. यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांसह सर्व महिलांचा समावेश असणार आहे. दिव्यांग पोलिंग स्टेशन हे तात्यासाहेब मुसळे विद्यालय पूर्व-पश्चिम इमारतीमध्ये केंद्र क्र. १८५ येथे असणार आहे. येथील सर्व अधिकारी कर्मचारी दिव्यांग असणार आहेत.
त्यासोबत नोकरीमध्ये नव्याने आलेल्या युवकांना मतदानाविषयी माहिती व्हावी, यासाठी महात्मा गांधी कन्या विद्यामंदिर महापालिका शाळा क्र. १८ खोली क्र. १ मध्ये केंद्र क्र. २३८ हे युथ पोलिंग स्टेशन असणार आहे. चौथे मॉडेल पोलिंग स्टेशन बालाजी विद्यालय-ज्युनिअर कॉलेज पूर्व-पश्चिम इमारत, पश्चिमेकडून खोली क्र. ५ मध्ये केंद्र क्र. १४५ आणि व्यंकटराव हायस्कूल उत्तरेकडील जुनी इमारत पूर्व बाजू हे केंद्र क्र. २१२ येथे असणार आहे. येथे सर्व सोयीसुविधा असणार असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी दिली.