मतदान प्रक्रियेसाठी सोलापूर लोकसभा प्रशासन सज्ज…

सोलापूर लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोहोळ महसूल प्रशासन सज्ज झाले असून, या प्रक्रियेसाठी एकूण 1 हजार 966 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या निवडणुकीसाठी मोहोळ विधानसभा मतदार संघातील तीन लाख 19 हजार 808 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली.
या संदर्भात निवडणूक नायब तहसीलदार अनिल शहापुरे यांनी दिलेल्या माहिती नुसार, मोहोळ विधानसभा मतदारसंघात एकूण 331 मतदान केंद्र आहेत. मतदार संघात कुरुल, कौठाळी, सरकोली, लमाण तांडा व राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला मोहोळ ही पाच आदर्श मतदान केंद्र आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व बिनचूक पार पडावी या साठी नियुक्त केलेल्या 1 हजार 966 कर्मचाऱ्यांना मौखिक व यांत्रिक अशी दोन प्रशिक्षणे दिली आहेत.

सोमवारी मतदान यंत्र घेऊन जाताना एक तासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 85 वयोगटाच्या पुढच्या व दिव्यांग अशा एकूण 196 मतदारांची मतदान प्रक्रिया पार पडली.मंगळवारी लोकसभेच्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी मोहोळ महसूल प्रशासन सज्ज झाले आहे. सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्या असल्याची खात्री केली आहे. कर्मचारी व अधिकारी यांना विविध सूचना दिल्या आहेत.