कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे राजकीय भवितव्य सामावलेली मतदान यंत्रे बुधवारी दुपारी स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद झाली. कोल्हापूर मतदारसंघातील यंत्रे रमणमळा येथे, तर हातकणंगले मतदारसंघातील यंत्रे राजाराम तलाव येथील गुदामात ठेवण्यात आली असून, ते मतमोजणीपर्यंत केंद्रीय पोलिस पथक, एसआरपीएफ व राज्य पोलिसांच्या त्रिस्तरीय सुरक्षेत असणार आहेत.मतमोजणी ४ जून रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल.
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यात मंगळवारी मोठ्या चुरशीने व उत्साहाने ७१ टक्क्यांवर मतदान झाले. अनेक केंद्रांवर सायंकाळी ६ वाजून गेल्यानंतरही रात्री ८-९ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रे लोकप्रतिनिधींच्या उमेदवारांच्या समोर सीलबंद करून विधानसभा मतदारसंघात आणायलाच मध्यरात्र झाली. येथे मतदान यंत्रे स्वीकारल्यानंतर उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर त्यांची छाननी झाली, त्यानंतर पहाटे ४ वाजल्यापासून मतदान यंत्रे गुदामाच्या ठिकाणी यायला सुरुवात झाली.
कोल्हापूर मतदारसंघासाठी मतदान झालेली यंत्रे रमणमळा येथे तर हातकणंगले मतदारसंघासाठी मतदान झालेली यंत्रे राजाराम तलाव येथील गुदामात मतदारसंघनिहाय स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली. शेवटची गाडी सकाळी ६ वाजता दाखल झाली. त्यानंतर छाननी, मतदान यंत्रांची संख्या ही पडताळणी झाल्यावर सकाळी साडेदहा वाजता निवडणुकीसाठी नियुक्त ऑब्झर्व्हर आले. त्यांच्यासमोर सर्व यंत्रांचे सीलिंग करण्यात आले.