हुपरी येथील विठ्ठल चौक येथील विठ्ठल रुक्माई ट्रस्ट व दत्त मंदिर ट्रस्ट यांच्या मालकीचे दुकानगाळे आहेत. येथे मोहन आनंदराव पवार यांच्या चांदी आटनी व टंचाचे दुकान आहे. ते दुकान बंद करून जेवायला गेले होते. यावेळी अचानक दुकानांमध्ये आग लागली. बघता बघता आगीने रूद्र रूप धारण केले. यामुळे शेजारी लागून असलेल्या पितांबर शिगारे याच्या चांदी सूत मशीन दुकानालाही आग लागली.
शेजारच्या लोकांनी आरडाओरडा सुरू केला. दूपारच्या धगीत आग लागल्याने लागोपाठ अनेक दुकाने व घरे असल्यामुळे एकच गोंधळ उडाला. या भागातील नारायण चौक मित्र मंडळ, विठ्ठल चौक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. यामध्ये अंदाजे ४ लाखांचे नुकसान झाले आहे.तोपर्यंत हुपरी नगरपरिषदेची आणि जवाहर साखर कारखान्याचे अग्निशामक दल दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. केवळ दैव बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला. यामध्ये अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले आहे. महसूल विभाग सुट्टीवर असल्याने याचा पंचनामा झाला नाही. हुपरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली नाही.