आटपाडीत पाकाळणीस वरुणराजाने लावली हजेरी!

सध्या सगळीकडे यात्रांचा सिझन चालू आहे. अनेक गावांत आराध्य दैवताची यात्रा भरवली जातात. अनेक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेची पाकाळणीने सांगता झाली. पाकाळणीस वरुणराजाने हजेरी लावल्याने भाविकांचा उत्साह द्विगुणीत झाला.

गुरुवारी पाकाळणीनिमित्त मुख्य मंदिरात यंत्राच्या साह्याने पूर्ण स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर देवाच्या नित्य पूजेतील सर्व वस्तू, दागिने, कपडे यांचीही स्वच्छता करण्यात आली. मंदिरातील पुजारी, सेवेकरी, भाविक यांनी परिश्रम घेतले.
दुपारी दोन वाजता अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अर्धा तास फक्त खरसुंडी गावात पाऊस झाला. पाकाळणीला दमदार पावसाच्या हजेरीमुळे भाविक व ग्रामस्थ सुखावून गेले.