पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे घरगुती कारणावरून झालेल्या मारामारीत चौघे जखमी झाले. याप्रकरणी हुपरी पोलिसांत परस्पर विरोधी फिर्यादी दाखल आहेत. एकाच कुटुंबातील व नातेवाईक अशा १०गुन्हे दाखल केले आहेत… दरम्यान, या तक्रारी घेऊन हुपरी पोलिस ठाण्यात आल्यानंतर तेथेही वाद झाला. या वादात साध्या वेशात असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबलला धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही.सुप्रिया श्रीकांत गायकवाड (वय ३१, रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, भाऊ विशाल भरत कांबळे व भावजय धनश्री विशाल कांबळे यांनी, तू माहेरी का आलीस म्हणून मला काठी व दगडाने मारहाण करून जखमी केले.
याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हर्षवर्धन भरत कांबळे (रा. पट्टणकोडोली) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, भाऊ विशाल कांबळे यांच्यात प्लॉट व घराच्या वाटणीवरून वाद आहे. त्यातून विशाल नेहमी शिवीगाळ व मारहाण करत असतो. आज हर्षवर्धन यांची आई, चुलते, बहीण व भाची पिराच्या दर्शनासाठी आले असता, त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी हर्षवर्धन हे घरी मारहाणीच्या भीतीने लपून बसले होते.
त्यावेळी पाठलाग करून, घरातून ओढून लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. याप्रकरणी दौलत कांबळे, छाबुबाई कांबळे (दोघे रा. जयसिंगपूर) व आठ अनोळखींविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.धनश्री विशाल कांबळे (रा. पट्टणकोडोली) यांनी फिर्यादीत म्हटले आहे, किरकोळ कारणावरून तलवार व काठीने मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी हर्षवर्धन भारत कांबळे, भाग्यश्री हर्षवर्धन कांबळे, सासू मीना भारत कांबळे, नणंद सुप्रिया कांबळे व चुलत सासू गौतमी विलास कांबळे, विलास राऊ कांबळे (रा. महाड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत धनश्री व त्यांचे पती विशाल हे जखमी आहेत.
