माढा लोकसभा मतदारसंघाच्या निकालाची चावी पुन्हा एकदा माळशिरसच्या हाती असणार आहे. मात्र, फलटण (१५ हजार ४०१) आणि माण खटावमध्ये (२२ हजार ७६८) गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात जाणार, यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे.विशेषतः मोहिते पाटील आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांची युती ‘तुतारी’ला किती लीड देणार, यावरच मोहिते पाटील यांच्या विजयाचे समीकरण ठरणार आहे. कारण, फलटण आणि माणमध्ये वाढलेली मतेही विचारात घ्यावी लागतील. त्यातच भाजपने शेवटच्या टप्प्यात लावलेली ‘ताकद’ विशेष लक्षणीय होती. त्यामुळे माळशिरस मोहिते पाटलांना किती लीड देणार आणि माण-खटाव, फलटण निंबाळकरांना किती हात देणार, यावरच माढ्याचा पुढचा खासदार ठरणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात अत्यंत चुरशीची लढाई झाली. माढ्याची निवडणूक अनेक अर्थाने गाजली. मोहिते पाटील यांची बंडखोरी, शिवरत्न बंगल्यावर प्रथम रामराजेंसोबत, तर त्यानंतर शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत रंगलेली डिनर डिप्लोमसी विशेष चर्चिली गेली. त्यानंतर निवडणूक ऐन मध्यावर आली असताना पवारांचे कट्टर समर्थक अभिजित पाटील अध्यक्ष असलेल्या विठ्ठल साखर कारखान्यावर कारवाई झाली. त्यानंतर पाटलांचा भाजपला पाठिंबा, बॅंकेची जप्तीची कारवाई मागे घेणे, हा इतिहास सर्वश्रूत आहे.