इचलकरंजीमध्ये सुळकूडप्रश्नी तज्ज्ञ समितीच्या कामाला गती….

इचलकरंजी शहरासाठी काळम्मावाडी धरणातून पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नियुक्ती केली आहे.मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार ही समिती आता कामाला लागली आहे. काळम्मावाडी धरणातून इचलकरंजीला पाणी देणे योग्य की अयोग्य याचा अहवाल तयार केला जाणार आहे.
इचलकरंजी शहरासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक आहे. हे पाणी देताना कोणाचेही पाणी हिरावून घेतले जाणार नाही. या विषयावर मध्यम मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे.

यामध्ये सुळकूड पाणीपुरवठा कृती समितीचे प्रतिनिधी, जलसंपदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगरपालिकेचे अधिकारी, तसेच तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश केला आहे. दरम्यान, या समितीने पाणीपुरवठ्याबाबत एकत्रित बैठक घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे या समितीच्या बैठकीवर मर्यादा येत होत्या.दरम्यान, आता ही समिती आपापल्या दिलेल्या कामानुसार याची चौकशी आणि पाहणी करून त्याचा विस्तृत अहवाल राज्य शासनाला देणार आहे. त्यानंतर तत्काळ यावर कारवाई करून इचलकरंजीच्या पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

इचलकरंजीला पाणी मिळावे आणि पाणी देऊ नये, असे म्हणणाऱ्या दोन्ही समित्यांना विश्‍वासात घेऊनच या समितीला काम करावे लागेल, असे चित्र आहे. दोन्ही बाजूंच्या लोकांची तीव्र भावना आणि गरज लक्षात घेता, यावर तोडगा काढण्यासाठी शासनानेही त्वरित पुढाकार घेणे गरजेचे आहे.सुळकूडला पाणीपुरवठ्याबाबत तज्ज्ञ समितीची बैठक झाली आहे. बैठकीमध्ये प्रत्येक विभागाने आपल्यावर कोणती जबाबदारी आहे, हे सांगून त्या दृष्टीने हे काम पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.