माढा मतदारसंघात लाेकसभा निवडणुकीचे मतदान हाेताच नीरेचे पाणी बंद केल्याने पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर दूसरीकडे आज (शनिवार) भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नीरा कालवा लाभधारक शेतक-यांची शिवरत्न बंगला येथे बैठक बाेलावून येत्या साेमवारी (ता.13 मे) फलटणच्या नीरा उजवा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला.
यावेळी माेहिते-पाटील यांनी माेठ्या संख्येने या माेर्चात सहभागी व्हावे असे आवाहन शेतक-यांना केले.भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे लोकसभा निवडणुकी नंतर सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज माेहिते पाटील यांनी नीरा कालवा लाभधारक शेतक-यांची बैठक बाेलावली. या बैठकीत अनेकांनी नीरेचे पाणी बंद केल्याची व्यथा माेहिते पाटील यांच्यापूढे बाेलावून दाखवली.
यावेळी ज्येष्ठ नेते विजयसिंह माेहिते पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित हाेते.त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले पाणी प्रश्न हा काेणत्याही तालुक्याच्या विराेधातील विशेषत: फलटण तालुक्याच्या विराेधातील नाही. पाणी मिळाले पाहिजे यासाठी आपण आग्रही राहू. लाेकशाही पद्धतीने आपण फलटण कार्यालयावर माेर्चा काढू. धर्मपूरी येथे सर्वांनी जमावे असेही माेहिते पाटील यांनी नमूद केले.