वाहनाचा टायर फुटल्याने तीन शेतमजूर महिला जागीच ठार तर नऊजण जखमी

शनिवारी सकाळी आठ वाजण्याचे सुमारास सांगोला ते जत रोडवरील सोनंद गावाजवळील चव्हाण मळ्याजवळ, लक्ष्मीनगर हद्दीत (ता. सांगोला) केए २४ एम ११२१ या क्रुझर गाडी चालक संशयित आरोपी जगदाळ याच्यासह कासेगाव (ता. पंढरपूर) येथे शेतमजुरीसाठी १२ मजूर जात होते. सांगोला ते जत रोडवर सोनंद (ता. सांगोला) येथे शेतमजूर घेऊन पंढरपूरकडे येणाऱ्या क्रुझरचा टायर फुटल्याने क्रुझर पलटी झाली.

चालक कुमार याने त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगाने, वाहनाचा रस्त्याच्या परिस्थितीचा विचार न करता, हयगयीने आणि भरधाव वेगाने चालविल्याने गाडीच्या डाव्या बाजूचे मागील टायर अचानक फुटल्याने गाडी रस्त्यावर पलटी झाली. गाडीतील महिला गाडीतून फेकल्या गेल्याने गंभीर मार लागून जखमी झाल्या. या अपघातात तीन महिला मृत्युमुखी पडल्या. या अपघाताची फिर्याद जखमी कविता अमर दिवटे (वय ३०, धंदा, मजुरी, रा. बळीगिरी, ता. अथणी, जि. बेळगाव) यांनी दिली आहे.

त्यामध्ये गीता रवींद्र दौडमनी (वय ३९, रा. बळीगिरी, ता. अथणी जि. बेळगाव, कर्नाटक) कस्तुरी शंकर भिरडे (वय ६४, मलबाद, ता. अथणी, जि. बेळगाव, कर्नाटक), महादेवी श्रीषैल चैगुला (वय ४०, रा. बळीगिरी, ता. अथणी, जि. बेळगाव, कर्नाटक) या जागीच ठार झाल्या. तर नऊजण जखमी झाले आहेत. क्रुझर चालक संशयित आरोपी कुमार ऊर्फ श्रीनिवास काहाप्पा जगदाळ (वय २५, रा. बळीगिरी, ता. अथणी, जि. बेळगाव) याच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.