खानापूर-जाधववाडी रस्त्याचे काम अद्याप रखडलेलेच……

खानापुरात दवाखाने, शिक्षण संस्था, बँका, कापड दुकाने, सोने, चांदीची दुकाने मोठ्या प्रमाणात असल्याने आजूबाजूच्या गावातील लोकांची या ठिकाणी खरेदीसाठी व कामानिमित्त नेहमी वर्दळ असते. जाधववाडी परिसरातील विद्यार्थी व नागरिकांना कामानिमित्त व शिक्षणानिमित्त खानापूर हे सोयीचे ठिकाण आहे. पूर्वीचे डांबरीकरण खराब झाल्यामुळे या रस्त्याचे काम सुरू होते.

खानापूर व जाधववाडी यांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम सहा महिन्यांपूर्वी चालू केले होते. मात्र, ते काम अद्याप रखडले आहे.
गुहागर – विजापूर महामार्गावर असलेले खानापूर हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. रस्ता रुंद करून त्याच्यावर खडी पसरली होती. या खडीवर रोलर फिरवला. पण, डांबरीकरण न केल्यामुळे ही खडी आता उखड्ड लागली असून, वाहनधारकांना याचा मोठा त्रास होत आहे.

रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडू लागले असून, अपघाताचे प्रमाण या रस्त्यावर वाढू लागले आहे. रात्री या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.