शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रूक योजनेच्या पडवळवाडी ते मानकरवाडीदरम्यान असणाऱ्या १० किलोमीटर अंतरातील कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. परिणामी उताराच्या बाजूची सुमारे ५०० एकर शेत जमीन नापीक झाली आहे. याचा फार मोठा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
वाकुर्डे बुद्रुक योजनेमुळे वाळवा तालुक्यात पाणी जाऊन पश्चिम भाग ओलिताखाली येणार आहे. त्याला आमचा विरोध नाही. मात्र, शासनाने आम्हाला देशोधडीला लावून आमच्यावर अन्याय करू नये. जमिनीचा मोबदला आणि सदोष पंचनामे दुरुस्त करून पीक नुकसानीसह झाडाझुडपांची भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी नाथाभाऊ शेटके यांनी केली.
कालव्यासाठी पिकाऊ जमिनी गेल्या. त्याचा मोबदला अद्याप मिळाला नाही. खुदाईचा भराव आमच्याच शेतात टाकल्याने पेरणीही करता येत नाही. कालव्याच्या गळतीमुळे शिल्लक जमीन नापीक झाली आहे. त्यामुळे गाव सोडून जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, अशी भावना निवृत्ती शेटके यांनी व्यक्त केली.
पडवळवाडी, नळवा वस्ती, माळ वस्ती, नारजी वस्ती, तरसे वस्ती, रामोशी वस्ती, पारगावकर वस्ती, धाकली अंत्री, जोतिबा मंदिर ते मानकरवाडी या परिसरातील कालव्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे हे शेतकरी गेल्या ७ वर्षांपासून सांगत आहेत. मात्र त्यांच्या या आर्जवाकडे शासनाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे त्यांच्या संयमाचा बांध सुटला आहे. ते म्हणाले. या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे कालव्यातून प्रचंड प्रमाणात पाण्याची गळती होऊन कालव्याशेजारी उताराला असणाऱ्या ५०० एकर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांना कोणतेही पीक घेता येत नाही. धूळ वाफेने भाताची पेरणी होत नाही. कालव्यासाठी ज्या जमिनी गेल्या त्याचा मोबदला मिळालेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे शेतकरी पाटबंधारे विभागासह शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र या शेतकऱ्यांवरील अन्याय थांबलेला नाही. त्यामुळे १६ मेपासून करमजाई देवी मंदिरासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहोत.