काल सर्वत्र मोठ्या उत्साहात शिव जयंती साजरी करण्यात आली. अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. तसेच पारंपरिक वेशभूषा, तसेच डॉल्बीच्या दणदणाटाने मिरवणूक काढण्यात आल्या. पण खानापूर येथे मात्र शिवजयंती एक अनोख्या उपक्रमाने साजरी करण्यात आली. खानापूर येथील अवधूत पाटील व कुटुंबीयांनी शिवरायांची ३९३ वी जयंती साजरी करताना समाजामध्ये शिवविचारांची देवाणघेवाण व्हावी, विचार कृतीत उतरावेत, एक सक्षम व निर्भिड पिढी उदयास येण्याबरोबरच पर्यावरणाचा ढासळता समतोल अबाधित राहताना झाडांचे महत्व अधोरेखित करत त्यांच्या जतन व संवर्धनाची चळवळ अधिक गतिमान करताना शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविले.
सकाळच्या सत्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस अभिषेक, शिवप्रतिमेस पुष्पहार घालून पुजा करण्यात आली. सोहळ्यात मिथाली पाटील व जान्हवी पाटील हिने शिवप्रेरणा मंत्र म्हटले. प्रसाद वाटपाने पहिल्या सत्राची सांगता झाली. दुपारच्या सत्रात तळेमाऊली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा पावसाळ्यामध्ये रोपण केलेल्या झाडांना टँकरद्वारे पाणी देत पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. झाडांना पाणी देण्याच्या उपक्रमात पर्यावरणमित्र अवधुत पाटील, जान्हवी पाटील, मिथाली पाटील आदींनी सहभाग घेतला.
