भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात उघड उघड बंड करत खासदार संजय काका पाटील यांचा प्रचार करणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे पाठवून दिला. मात्र त्यांचा राजीनामा अद्यापही मंजूर झाला नसल्यामुळे उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.लोकसभा निवडणुकीत लोकसभेचा उमेदवार बदला, अशी आग्रही मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली होती.
मात्र पक्षाने पुन्हा संजय काका पाटील यांच्या पारड्यात वजन टाकत त्यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे माजी आमदार विलास जगताप हे कमालीचे नाराज झाले. विधानसभा निवडणुकीत खासदार संजय काका पाटील यांनी माझ्याशी गद्दारी केली आहे, असा त्यांनी आरोप केला होता. पक्षाने उमेदवार न बदलल्यामुळे माजी आमदार विलासराव जगताप यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा यांना पाठिंबा दिला. अपक्ष उमेदवार विशाल पाटील हेच निवडून येणार कोणीही पैज लावा, असे जाहीर आव्हान त्यांनी केले.
भाजपमधील अनेक नेत्यांनी संजय काका पाटील यांना विरोध केला होता. भाजपचे सांगली जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची ऑडिओ क्लिप निवडणुकीच्या दरम्यान व्हायरल झाली होती. त्यामध्ये ते संजयकाकांना मतदान करायचं नाही, आपल्याला विशाल पाटील यांनाच मतदान करायचा आहे. अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संजयकाका यांनी वरिष्ठांना कळवत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं आहे.