खानापुरात धोकादायक इमारतींना नोटीस!

खानापूर शहरामध्ये जुन्या व पडक्या जागांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या जागांच्या स्वच्छतेचा व परिसरातील लोकांच्या सुरक्षिततेबद्दलचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. परिसरातील नागरिकांनी नगरपंचायतीकडे या जागांचे सर्वेक्षण करण्याची व धोकादायक इमारती पाडण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन खानापूर नगरपंचायतीने शहरातील धोकादायक, पडक्या इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावल्या आहेत.

खानापूर शहरातील अनेक इमारती धोकादायक बनल्या आहेत. नागरिकांनी घराचा कोणताही भाग धोकादायक स्थितीत असल्यास अथवा काही भाग अर्धवट पडलेल्या असल्यास तो नगरपंचायतीच्या पूर्वपरवानगीने त्वरित काढून टाकावा.तसेच किरकोळ दुरुस्ती असेल तर ती करून घ्यावी. जुने बांधकाम पाडून नवीन करावयाचे असल्यास त्याबाबतचे प्रस्ताव नगरपंचायतीकडे दाखल करून रीतसर परवानगी घेऊन बांधकाम करावे.

आपल्या कुटुंबीयांच्या तसेच परिसरातील अन्य रहिवाशांच्या जीविताचे रक्षण करावे.रस्त्याकडेला घर असल्यास रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका होणार नाही, याची दक्षता घ्यावी. दक्षता न घेतल्याने कोणतीही वित्त अगर जीवितहानी झाली झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित घरमालकाची राहील. त्यामुळे धोकादायक इमारतीच्या मालकांनी त्वरित दक्षता घ्यावी, धोकादायक भाग पाडुन टाकावा, असे आवाहन खानापूर नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे.