पेठवडगाव येथे भादोले रोडवरील सुनील रामचंद्र शिंदे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही चोरी झाली.
सुनील शिंदे कामानिमित्त ठाणे येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील साहित्य विस्कटले. कपाटाचे दारही उचकटून हाती लागेल तो किमती ऐवज लंपास केला. शिंदे यांनी घरी सीसीटीव्ही बसवला आहे. त्याचे फुटेज त्यांना मोबाईलवर दिसत असल्याने दररोज ते पहात असतात. शनिवारी सकाळी सहाच्या दरम्यान त्यांनी फुटेज पाहिले असता त्यांना वडगावमधील घराचा दरवाजा उघडा असुन चोरी झाल्याचे दिसले.
त्यांनी वडगाव पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिले. शिंदे हेही सायंकाळी दाखल झाले. चोरट्यांनी सोन्याची अंगठी, टॉप्स, चांदीचे ताट, कलश, पुरस्कार, पैंजण, दोन घड्याळे व रोख सोळा हजारे लंपास केले .पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यात अपयश आले. घटनेची नोंद वडगाव पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी समीर साळवे, पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपनिरीक्षक गिरीष शिंदे करत आहेत.