पेठवडगाव, पारंपरिक टाळ मृदुंग, लेझीम, ढोलताशा, हलगी घुमकं, डॉल्बी व लेसरशोच्या तालावर तरुणाईने ठेका धरला. फटाक्यांची आतिषबाजी करत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. यंदा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची किनार लाभल्याने मिरवणूका नगरपालिका चौकात रेंगाळल्या. वडगावच्या इतिहासात यंदा गणेश विसर्जन करण्यासाठी तब्बल १९ तास लागले. पहाटे चारच्या सुमारास गणेश तलाव येथे जयसिंगपूरचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या उपस्थितीत क्रांतीवीर युवक मंडळाची आरती झाल्यावर गणेश विसर्जन झाले.
विसर्जनाच्या आदल्या दिवशी युवा ग्रुपने दीडशे वारकऱ्यांसह आकर्षक मिरवणूक काढली तर वडगाव तालीम मंडळाने लेसर शो व डॉल्बीवर ठेका धरला होता. स्वस्तिक मित्र मंडळाचे केरळी वाद्यवृंद मिरवणूक लक्षवेधी ठरली. साजन ग्रुपने पंढरीचा वारकरी वेशभूषेत टाळ मृदंग वाजवत पालखीतून गणेशाची आकर्षक मिरवणूक काढली. संकेत ग्रुपच्या रॅलीत बच्चे कंपनीचा “आमची माधुरी परत मिळालीच पाहिजे” असा फलक लक्षवेधी ठरला. अनंत चतुर्दशीच्या शनिवारी सकाळी सुरुवातीला दिलीपसिंह यादव शाळेने गणेश विसर्जन केले.
सहारा ग्रुप, खंडोबा ग्रुप, क्रांतीसिंह युवक मंडळ, क्रांतीवीर युवक मंडळांनी पालिक चौकात फटाक्यांची के ल ेली आतिषबाजी व लेसर शो रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. रात्री बारा वाजता पोलिसांनी डॉल्बीचा आवाज बंद केला तरी पारंपरिक हलगी, धुरासह लेसर शो रात्री उशिरा अडीच वाजेपर्यंत सुरूच होता. नगरपालिकेच्यावतीने विसर्जनासाठी लाईफ जॅकेट, अग्निशमन यंत्रणा, वैद्यकीय पथक व क्रेनची सोय केली होती.
नगरपालिका चौकात यादव आघाडी, युवकक्रांती महाआघाडी,भाजप पक्ष असे तीन स्वागत मंडप होते. यावेळी माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, माजी नगराध्यक्ष विद्याताई पोळ, अभिजीत गायकवाड, डॉ. अशोक चौगुले, माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, प्रविता सालपे, रंगराव पाटील- बावडेकर, अजय थोरात, सुकुमार पाटील, जगन्नाथ माने आदि कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. जलतरण तलाव येथे नगरपालिकेने स्वागत मंडप उभारला होता. शहरात गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष माने, कॉ. महेश गायकवाड, आबा गुंडणके यांच्यासह पोलिस बंदोबस्त तैनात होता.
