महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा समझाेता झाला आहे. यासह उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केलेली आहे. यावरून सांगली काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आज ठाकरे गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यात सांगलीतून चंद्रहार पाटलांचे नाव कायम झाल्यास काँग्रेस आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. परिणामी सांगली लोकसभा मतदारसंघातील आघाडीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.शिवसेनेकडून चंद्रहार यांच्या नावाचा अधिकृत यादीत समावेश केल्याचे बोलले जाते. पण तसे झाल्यास काँग्रेसची भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत.
सांगलीसह अद्याप पाच जागांवरील वाद कायम आहे. तो सुटल्याशिवाय शिवसेना यादी जाहीर करत असेल तर काँग्रेसने मागे पाहू नये, आपली यादी जाहीर करावी, असा आक्रमक पवित्रा घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.