कोल्हापुरातून बिहार- उत्तरप्रदेशमध्ये रेल्वे सुरू करावी

आठवड्यातून किमान दोन दिवस बिहार- उत्तरप्रदेशमधून कोल्हापूर आणि भुवनेश्वर ते कोल्हापूर अशा दोन रेल्वे (Railway) गाड्या रेल्वे सुरू करण्याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

इचलकरंजी शहर व परिसरात वस्त्र उद्योगामध्ये कामगारांची कमतरता भासू लागली आहे. त्यासाठी वेगवेगळी अनेक कारणे असली तरी सुलभ प्रवासाचे साधन हे एक प्रमुख कारण आहे. शहर व परिसरातील यंत्रमाग उद्योग हा परप्रांतीय कामगारांवर अवलंबून असल्यामुळे त्यांच्या येण्या जाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे कामगारांना इचलकरंजीला थेट येण्यासाठी रेल्वेची व्यवस्था नियमित असावी यासाठी बिहार उत्तरप्रदेश मधून कोल्हापूरपर्यंत त्याचबरोबर ओडिसाची राजधानी भुवनेश्वरपासून कोल्हापूरपर्यंत अशा दोन रेल्वे गाड्या आठवड्यातून किमान दोन दिवस सुरू झाल्यास येथील कामगारांना गावाकडे जाणे-येणेची थेट सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील धर्मिकस्थळे आणि ओडिसामधील जगन्नाथपूरी व त्या राज्यातील भक्तांसाठी महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांबरोबरच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन सुलभपणे होणार आहे. त्यासाठी या दोन रेल्वे सुरू करण्याबाबत पाठपुरावा करावा, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, चंद्रकांत भोपळे, पांडूरंग सोलगे, सुभाष बलवान, किरण पोवार, राजाराम गिरी, प्रकाश मोरे, उद्योजक गजानन होगाडे, उपस्थित होते.