इचलकरंजी महापालिका ॲक्शन मोडवर …..

शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग वाढले आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आले आहे. कचरा संकलित व वाहतूक करणाऱ्या आदर्श फॅसिलिटी या मक्तेदार कंपनीला नोटीस काढली आहे. त्‍यामध्‍ये दोन दिवसांत शहरातील सर्व कचरा उठाव न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी पाहणी करणार आहेत.
दरम्यान, शहरात सर्वत्र कचरा साचला आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी संबंधितांवर जबाबदारी निश्चीत करण्याचे काम महापालिका आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. कचरा उठाव व वाहतूक वेळेत करण्यासाठी मक्तेदार कंपनीला नोटीस काढून सूचना दिल्या आहेत. शहरात वरिष्ठ अधिकारी सकाळी फिरती करणार आहेत. यामध्ये स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. स्वच्छतेच्या कामात हयगय आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.