रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सुरक्षेच्या कारणानं राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या एलिमिनेटरच्या लढतीपूर्वीचं सरावाचं सत्र रद्द केलं आहे. याशिवाय आरसीबीनं पत्रकार परिषद देखील सुरक्षेच्या मुद्यावरुन रद्द केली आहे. आरसीबीचा सराव मंगळवारी गुजरात कॉलेज ग्राऊंडवर होणार होता. मात्र, आरसीबीनं कोणतंही अधिकृत कारण न सांगता सराव सत्र रद्द केलं होतं. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सनं सराव सत्रात सहभाग घेतला. विराट कोहलीसह इतर खेळाडूंच्या सुरक्षेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाल्यानं आरसीबीनं या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद देखील रद्द केली.
आयपीएलमध्ये क्वालिफायर-1 ची मॅच काल नरेंद्र मोदी स्टेडियमवर चालू असल्यानं दोन्ही संघांना सरावासाठी दुसऱ्या मैदानावर जावं लागणार होतं. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील मॅच काल सुरु होती. केकेआरनं ती मॅच जिंकली. गुजरात कॉलेजचं मैदान पर्याय म्हणून दोन्ही संघांना देण्यात आलं होतं.
गुजरात पोलिसांच्या अधिकाऱ्यांचा दाखला देत बंगाली भाषेतील दैनिक आनंदबझार पत्रिका या वृत्तपत्रानं आरसीबीनं सराव सत्र रद्द करण्याचा आणि दोन्ही संघांनी पत्रकार परिषद रद्द करण्याचा निर्णय घेण्यामागील कारण सुरक्षेचं कारण असल्याचा दावा करण्यात आला आहे. विराट कोहलीच्या सुरक्षेला धोका असल्याच्या कारणावरुन पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.