मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन शिवसेना खासदाराने केला सत्कार…

राज्यातील लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात मराठवाड्यातील बीड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान झालं. राज्याचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यंदा वेगळ्याच वळणावर केल्याचं दिसून आलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात अग्रस्थानी असल्याने यंदाच्या निवडणुकीत उपोषणकर्ते मनोज जरांगेंचा फॅक्टरही काम करुन गेला आहे. ज्याला पाडायचंय त्याला पाडा, असे म्हणत जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाला आवाहन केलं होतं. त्यामुळे, जरांगेंची नेमकी भूमिका उघड झाली नाही. मात्र, जरांगेचं कार्यक्षेत्र असलेल्या बीड, परभणी आणि जालना लोकसभा मतदारसंघात जातीय समीकरण चालल्याची चर्चा आता जोर धरत आहे. त्यातच, मला आणि बीडमध्ये बजरंग सोनवणेंना मनोज जरागेंचा फायदा झाल्याचं परभणीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी म्हटलं आहे. 

परभणीतील विद्यमान खासदार आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट घेतली. मनोज जरांगेंचा ताफा अडवून खासदार जाधव यांनी जरांगेंचा सत्कार केला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मनोज जरांगेंचा आपल्याला फायदा झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर, आज जरांगे यांची भेट घेऊन त्यांनी सत्कार केला. परभणीच्या पोखरणी येथे मनोज जरांगे मराठा आरक्षण व समाजाच्या गाठीभेटी दौऱ्यासाठी आले असता याठिकाणी त्यांची भेट घेऊन संजय जाधव यांनी सत्कार केला आहे. निवडणुकीनंतर मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आपल्याला फायदा झाला असल्याचं संजय जाधव यांनी कबूल केलं होतं, तसेच आपण त्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, आज दोघांची भेट झाली.