इस्लामपूरात आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी एकजण ताब्यात

इस्लामपूरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी (अजित पवार गट) चंद्रशेखर प्रकाश तांदळे (रा. धनगर गल्ली, इस्लामपूर) याच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तांदळे यांना ताब्यात घेतले आहे. तांदळे यांनी त्यांना दमदाटी केल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी अक्षय विजय कोळेकर ( रा. अहिल्यानगर, इस्लामपूर) या संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तांदळे यांनी शुक्रवारी रात्री भाजपचे जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याविरोधात एका ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. निशिकांत पाटील यांच्या समर्थकांनी तांदळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. पोलिसांनी तांदळे याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. अजित पाटील यांनी फिर्याद दिली.