सांगली लोकसभा मतदारसंघात तीन पाटील आमने-सामने आहेत. महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील (ठाकरे गट), महायुतीचे संजयकाका पाटील, तर काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवलेले विशाल पाटील अशी तिरंगी लढत सांगलीत पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे असलेले संजयकाका 2014 ला ऐनवेळी भाजपात आले आणि खासदार झाले. त्यांना 2019 साली पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आले. मोदी लाटेत संजयकाका पुन्हा विजयी झाले. त्यानंतर आता भाजपने पुन्हा एकदा संजयकाका पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
यंदा त्यांना विजयाची हटट्रिक करण्याची संधी आहे.कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असे गणित शिवसेनेने मांडले आणि परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद म्हणावी तशी नाही. काँग्रेस, शरद पवार गटाची मदत त्यांना होईल अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांचे गणित बिघडण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्याचा मुलगा संसदेत जाणार, असा प्रचार चंद्रहार पाटलांनी केला.
मात्र त्याचा कितपत फायदा झाला हे निकालातून स्पष्ट होईल.काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटल्याने जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. विश्वजीत कदम यांनी तर जाहीरपणे काँग्रेस नेत्यांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. असं असलं तरी आघाडी धर्म पाळत जिल्हातील काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार केला. मात्र वसंतदादा घराण्यातील असल्याचा फायदा विशाल पाटील यांना होऊ शकतो.