भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी नव्या संघटनेची स्थापना केली. सांगली जिल्ह्यात त्यांनी संघटनेच्या २५ शाखांचे उद्घाटन केले. त्यामुळे पडळकर भाजपावर नाराज आहेत का अशी चर्चा होऊ लागली.
यावर गोपीचंद पडळकरांनी आपण पक्षावर नाराज नाही, माझ्या नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास आहे असं स्पष्ट सांगितले आहे. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, मी गेल्या १०-१५ वर्ष राजकीय, सामाजिक चळवळीत आहे. महाराष्ट्रभर दौरे करताना अनेक युवकांचे म्हणणं होतं, तुम्ही संघटना काढावी. त्या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला काम करता येईल. युवकांना जोडता येईल. त्यामुळे युवकांची मागणी लक्षात घेता हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेना ही संघटना मी काढली आहे. त्या संघटनेच्या २५ शाखांचे उद्घाटन आम्ही केलंय. युवकांचा खूप उस्फुर्त प्रतिसाद मिळतोय असं त्यांनी सांगितले.
तसेच गावगाड्यातील उपेक्षित वंचित, पीडित युवक आहेत. त्या सगळ्या समाजाच्या युवकांना एकत्रित करायचे आणि प्रस्थापितांविरोधात लढा द्यायचा, विस्थापितांना मानाचे सिंहासन मिळवून द्यायचे यासाठी संघटनेची स्थापना केलीय.