आता उत्सुकता निकालाची….

संपूर्ण राज्याला मतदानाची टक्केवारी वाढविण्याची चिंता लागून राहिली असताना उन्हाचा पारा ४० अंशांवर गेल्यावरही कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत अनुक्रमे ७०.३५ आणि ६८.०७ टक्के मतदान झाले.वेळ संपली तरी सायंकाळनंतर अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. काल, मंगळवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने मतदानाची ही टक्केवारी जाहीर केली.

मात्र, अंतिम टक्केवारी आज, बुधवारी सायंकाळी चार वाजता जाहीर करण्यात येणार असून, या दोन्ही मतदारसंघांमध्ये एक ते दीड टक्क्याने मतदान वाढणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.किरकोळ तांत्रिक अडचणी आणि शाब्दिक वाद वगळता मतदान शांततेत झाले. लोकसभेलाही ग्रामपंचायतीप्रमाणे रांगा लावून मतदान करून कोल्हापूरने मतदानाच्या टक्केवारीत आपण राज्यात भारी असल्याचे कृतीतून दाखवून दिले.

गेल्या निवडणुकीत कोल्हापूरला ७०.७७ आणि हातकणंगले येथे ७० टक्के मतदान झाले होते. कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही मतदारसंघांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तर पाचवेळा कोल्हापूरला आले व आठ दिवस त्यांचा मुक्काम होता.

ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही लढती अत्यंत चुरशीच्या झाल्या. कोल्हापूरचे शाहू छत्रपती रिंगणात असल्याने देशाचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले. शेट्टी यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार असल्याने त्याकडेही राज्याचे लक्ष राहिले.