इचलकरंजीत धैर्यशील मानेंना तब्बल ३८ हजारांवर मताधिक्य

हातकणंगले मतदारसंघात अत्यंत अटीतटीची लढत झाली. सुरुवातीच्या बारा फेरीपर्यंत उद्धवसेनेचे सत्यजित पाटील आघाडीवर होते. सोळाव्या फेरीनंतर हळूहळू धैर्यशील माने पुढे सरकले. त्यानंतरही मताधिक्य वर-खाली होत गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांची घालमेल झाली. परंतु अखेर विजयश्री माने यांनीच खेचून आणली. माने यांच्या उमेदवारीबद्दलही सुरुवातीला नाराजी होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघात त्यांचा स्वत:चा मतदारसंघ असल्याप्रमाणे ताकद पणाला लावली.

आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, माधवराव घाटगे, राजेंद्र पाटील यड्रावकर या नेत्यांना सगळी रसद पुरवून मतदारसंघाची जणू नाकाबंदीच केली. त्या तुलनेत सत्यजित पाटील यांची संघटनात्मक ताकद कमी पडली. गेल्यावळेलाही माने यांना इचलकरंजीने विजय मिळवून दिला होता. या निवडणुकीतही इचलकरंजीनेच त्यांना तब्बल ३८ हजारांवर मताधिक्य दिले. त्या तुलनेत सत्यजित पाटील यांना त्यांच्या हक्काच्या शाहूवाडी, वाळवा, इस्लामपूर मतदारसंघांनी पुरेशी ताकद दिली नाही.