अलीकडच्या काळात अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे वाहनधारक तसेच पादचारी लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच अनेक ठिकाणी या रस्त्यांमुळे अपघातामध्ये वाढ झालेली आहे. इचलकरंजी शहरात देखील अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. रस्ता दुरुस्तीसाठी मागणी देखील होत आहे. महासत्ता चौक ते ज्ञानेश्वर मंदीर, आणि महासत्ता चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या रस्त्यावर मजरेवाडीहून येणारी मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी सुमारे ६ महिन्यापुर्वी रस्ता खोदला होता.
त्याठिकाणी पाईपलाईनचे काम पुर्ण होऊन तीन महिने झाले. तरी रस्ता तयार करण्यात आला नव्हता. यामुळे वारंवार अपघात होत होते. याबाबत मधुकर मुसळे याच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यानी १३ जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम सुरु न केल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. दरम्यान, खासदार धैर्यशील माने यांनी आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि उपायुक्त प्रसाद काटकर यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले.
उपायुक्त काटकर यांनी मक्तेदारांना काम करण्यास सांगितले होते, तरीही ठेकदार दुर्लक्ष करीत होता. मात्र, सामाजिक कार्यकर्त्याच्या उपोषणाच्या ईशाऱ्यानंतर मक्तेदाराने रविवारी कामाला सुरुवात केली. आमराई रोड ते महासत्ता चौक, महासत्ता चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला दिल्यानंतर अवघ्या २४ तासात पॅचवर्कच्या कामास महापालिकेकडून सुरुवात करण्यात आली. यामुळे परिसरातील नागरिकांच्यात समाधान व्यक्त होत आहे.