भारताच्या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट!

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वात आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत जेतेपद मिळवण्याच्या हेतूने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात विजय मिळवून विजयाचा ट्रॅक पकडण्याचा हेतू आहे. असं असताना या स्पर्धेदरम्यान दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्णधार रोहित शर्माने स्पष्टपणे आपलं म्हणणं मांडलं आहे.

तसेच न्यूयॉर्कची खेळपट्टी, टीम टार्गेट, राहुल द्रविड आणि आपल्या कुटुंबाबात सर्वकाही सांगितलं आहे. भारतीय संघाच्या सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. भारत पाकिस्तान सामन्यात हल्ला करण्याचा कट असल्याची सुरक्षा यंत्रणांना माहिती आहे. त्यामुळे न्यूयॉर्कची सुरक्षायंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक टप्प्यावर सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून पाहारा देत आहे.

असं असताना याबाबत रोहित शर्मा विचारला असता त्याने आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे. “खेळाडू आणि क्रिकेट चाहत्यांची सुरक्षा खूपच महत्त्वाची आहे. कोणीही मैदानात घुसण्याचा प्रयत्न करू नये. कोणत्याही देशाच्या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे.”, असं रोहित शर्मा याने सांगितलं. अनेकदा चाहते खेळाडूंना भेटण्यासाठी मैदानात धाव घेतात. नुकतंच भारत बांगलादेश सराव सामन्यात त्याची प्रचिती घडली होती.