भिलवडीत राष्ट्रगीताने होते दिवसाची सुरुवात

राष्ट्रगीताने दिवसाची सुरुवात करणारे गाव, अशी आता भिलवडीची ओळख निर्माण झाली आहे. गावातील व्यापार्‍यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम अखंडित सुरू आहे.

भिलवडी हे सांगली जिल्ह्यातील कृष्णाकाठावरील 17,000 लोकसंख्येचे गाव.या गावात अनेक स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले. सैनिकांचे गाव म्हणूनही या गावाची ओळख आहे. कोरोना काळात गावातील सर्व व्यवसाय बंद होते.

सकाळी नऊ वाजता ही दुकाने उघडण्याची वेळ पोलिसांनी दिली. ही वेळ गावातील सर्वांना कळण्यासाठी व्यापार्‍यांनी 9.15 वाजता राष्ट्रगीत सुरू करून व्यवसाय सुरू करण्यास प्रारंभ केला. यामुळे सर्वांना ही वेळ माहीत झाली आणि गाव खरेदी-विक्रीसाठी एकत्र येऊ लागले. तिथून पुढे हा उपक्रम कायम सुरू ठेवण्यात आला.

सकाळी 9.15 वाजता राष्ट्रगीत सुरू होत असल्याची सूचना गावातील एका इमारतीवर लावलेल्या भोंग्यावरून दिली जाते. त्यावेळी असेल त्या परिस्थितीमध्ये, असेल तेथे गावातील सर्व ग्रामस्थ, वाहने थांबतात व राष्ट्रगीताचा सन्मान राखतात.