डोक्यावर चाँद असणारा बोकडाची किंमत १८ लाख रुपये!

वडगाव बाजार समितीमध्ये भरलेल्या बाजारात वेगवेगळ्या जातींच्या बकऱ्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. या बाजारात अठरा लाख किमतीचा डोक्यावर चाँद असणारा वैशिष्ट्यपूर्ण देशी बोकड विक्रीसाठी आला होता.याला सात लाख किमतीस मागणी झाली; परंतु त्याचा व्यवहार झाला नाही. या बाजारात बकऱ्यांची आवक जास्त व खरेदीदारांची संख्या कमी असल्यामुळे बकऱ्यांचा दर ढासळला. मुस्लिम धर्मियांचा सोमवारी (ता. १७) बकरी ईद असल्यामुळे आजच्या बाजारात अन्य जनावरांच्या तुलनेत बकऱ्यांचा मोठा बाजार भरला होता.

या बाजारात बिटल, शिरुर, कवठेमहांकाळ, आटपाडी, कच्ची, अंडील अशा विविध जातींचे पालवे, बोकड विक्रीसाठी आले होते. याचा व्यापार करण्यासाठी व्यापारी, शेतकरी यांनी गर्दी केली होती. व्यापारासाठी रत्नागिरी, आटपाडी, मिरज, जत-माडग्याळ, सातारा, रहिमतपूर, पलूस अशा विविध भागांतून खरेदी-विक्रीसाठी शेतकरी, व्यापारी आले होते. बाजाराच्या आवारात पूर्वेस हा बाजार भरतो. पहाटेपासून बाजार सुरू झाला.

बकरी मोठ्या प्रमाणात येऊनही खरेदीदारांची संख्या कमी होती. त्यामुळे बकऱ्यांच्या किमती कमालीच्या कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे बाजारात सर्वाधिक किमतीचा बोकड विक्रीसाठी आला होता. नामदेव तुकाराम आवळेकर (रा. बोमनाळ, ता. अथणी, जि. बेळगाव) यांनी पालन केलेला बोकड लोकांचे खास आकर्षण ठरला. तीन वर्षे वयाचा बोकड असून जवळ जवळ पंच्याहत्तर किलो वजन आहे.

या बोकडाच्या कपाळावर चाँद असल्यामुळे त्याची किंमत अठरा लाख होती. त्याला एका व्यापाऱ्याने सात लाखास मागणी केली; परंतु व्यवहार झाला नाही. त्याची खास सोय असून वडगावच्या बाजारात विक्री न झाल्यास मिरज, कराड, मुंबईच्या बाजारात त्याला विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याचे सांगितले. मुंबईला त्याला चांगला दर मिळेल, अशी अाशा आहे. त्याच्या मालकाने हलगीच्या तालावर त्याची बाजारातून मिरवणूक काढली होती.