सध्या मान्सूनचे आगमन सर्वत्र सुरु झाले आहे. पावसाने आपली हजेरी लावली आहे. पावसाचे आगमन झाले असले तरी इचलकरंजी वासियांना पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पावसाळा सुरू झाला असतानाही शहरात पाण्यासाठी नागरिकांना दाहिदिशा करण्याची वेळ आली आहे.सध्या शहरात आठवड्यातून एकदा पाणी येत असल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
मजरेवाडी उपसा केंद्रातील सध्या एकच उपसा पंप सुरू आहे. दुसरा उपसा पंप गाळ अडकल्यामुळे बंद पडला आहे. यामुळे दररोज तब्बल १८ एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाली आहे. परिणामी, शहरातील पाणीपुरवठा सध्या पूर्णतः विस्कळीत झाला आहे. शहरात सध्या आठवड्यातून एकदा पाणी येत आहे.
परिणामी, ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिकांना शुद्ध पेयजल प्रकल्पांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या मजरेवाडी उपसा केंद्रातील उपसा पंप दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पण पाणीपुरवठा सुरळीत होण्यास आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.