मालगाडी रुळावरून घसरली……

सोलापूर रेल्वे विभागातून सिमेंट वाहतूक करणारी मालगाडी काल बुधवारी दुपारी रुळावरून घसरली. हा मार्ग आऊटसाईडचा व सिमेंट कंपनीच्या गोडावूनजवळील खासगी रेल्वेमार्ग होता.त्यामुळे याचा परिणाम प्रवासी रेल्वेमार्गावर झाला नसल्याचे वरिष्ठ वाणिज्य अधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले.

औज ते होटगी दरम्यान अल्ट्राटेक सिमेंट मालवाहतूक करणाऱ्या मालगाडीचे इंजिन व एक डबा रुळावरून घसरला होता. त्यामुळे रेल्वे गेट पडले, परंतु कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या घटनेमुळे औज, जेऊर, कणबसकडे जाणाऱ्या रेल्वेला दोन तास उशीर झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की रुळावरून गाडी घसरली. परंतु हा मार्ग प्रवासी वाहतुकीचा मार्ग नव्हता. सिमेंट कंपनीच्या गोडावूनमध्ये जाणारा अंतर्गत खासगी रेल्वेमार्ग होता. त्यामुळे याचा परिणाम कोणत्याही प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वे मार्गावर झाला नसून पावसामुळे पाच-सहा दिवसांपासून रेल्वे उशिरा धावत असल्याने रेल्वेंना उशिर होत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.