राजस्थान निवडणुकीचा प्रचार चक्क कोल्हापुरात..!

जस्थानमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. यातच सिरोही-शिवगंज विधानसभा मतदारसंघाचे आमदार व कॉंग्रेसचे उमेदवार संयम लोढा यांनी प्रचारासाठी थेट कोल्हापुरात येऊन येथील राजस्थानी समाजाशी संवाद साधला.

ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभेची निवडणूक असल्यास येथील स्थानिक उमेदवार मुंबईत स्थायिक झालेल्या मतदारांचे मेळावे घेत असल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. तीच पद्धत राजस्थानमध्ये निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने राबवली आहे. सध्या राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक सुरू झाली आहे. राजस्थानमधून अनेकजण येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. ते आपल्या गावी ये-जा करत असतात. त्याचबरोबर तेथील अनेकजण व्यवसायानिमित्त देशभर फिरत असतात. अशा प्रवास करणाऱ्या राजस्थानी व जैन समाजातील नागरिकांच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त भेटी घेण्यासाठी आमदार लोढा आले.

ते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सल्लागारही आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जैन समाज व राजस्थानी प्रवासी नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. तिथून त्यांनी अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. जैन मंदिरातील दर्शनानंतर गुजरीतील मरुधर भवनात प्रवासी आणि जैन समाजाशी संवाद साधला. निवडणुकीच्या प्रचारासाठी आल्याचे सांगत साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक ईश्वर परमार, मोहब्बतसिंग देवोल, रमेश पुरोहीत, गुलाबचंद राठोड, नरेंद्र ओसवाल आदी उपस्थित होते.