सात वर्षांपूर्वीचा राग मनात धरून तरुणास काठी व राॅडने बेदम मारहाण करण्यात आली. राकेश शिवाजी पुजारी ( वय ३०, नवभारत क्रीडा मंडळ शेजारी, पुलाची शिरोली) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात किसन यशवंत पुजारी व अनिकेत अमर कोरवी (दोघे, रा. पुलाची शिरोली) यांच्याविरुद्घ गुन्हा दाखल झाला. ही घटना बुधवारी पुलाची शिरोलीतील बिरदेव मंदिरासमोर घडली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : सात वर्षांपूर्वी रगपंचमीदिवशी राकेश व किसन यांच्यात वाद झाला होता.
राकेश बिरदेव मंदिरात दर्शनासाठी गेला असता पूर्ववैमनस्यातून किसन व अनिकेते राकेशला मारहाण करुन जखमी केले. यावेळी राकेशच्या गळ्यातील पाच तोळ्यांचा सोन्याचा गोफ व तोळ्याची सोन्याची अंगठी हरवली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.