टेंभूच्या गळतीने शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान! भरपाईची मागणी

आटपाडी शहराजवळ असणाऱ्या नांगरे मळा येथील गट नंबर ३४६१ मध्ये अरुण खांडेकर या शेतकऱ्यांची ३.५ एकर डाळिंबबाग आहे. सुमारे १७०० झाडे यामध्ये आहेत. याच शेतीतून टेंभू योजनेची बंदिस्त पाइपलाइन गेली आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाइपलाइनची गळती सुरू आहे. याबाबत शेतकरी अरुण खांडेकर यांनी अनेकवेळा टेंभूचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधत गळती दुरुस्त करण्याची मागणी करत आहेत.

आटपाडी शहराजवळच असलेल्या नांगरे मळा येथे मुढेवाडी मार्गे येणारी टेंभूची बंदिस्त पाइपलाइन एका शेतकऱ्याच्या डाळिंबबागेमध्ये लीक झाली आहे. शेतकऱ्याने वारंवार टेंभूच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत गळती थांबविण्याची विनंती केली आहे. मात्र टेंभूचे अधिकारी चालढकल करत असून, शेतकऱ्यालाच अरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोप शेतकरी अरुण खांडेकर यांनी केला आहे.

डाळिंब बागेमध्ये टेंभू योजनेच्या बंदिस्त पाइपलाइन गळतीने पाणी घुसल्यामुळे शेतकऱ्याच्या बागेचे नुकसान होत आहे. गळतीने बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुमारे १५० झाडे पूर्णतः पाण्यात असून, त्या झाडांवरील फळे आता गळून पडली असून, झाडेही जळून जाऊ लागली आहेत. परिणामी सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान होणार असल्याचे शेतकरी अरुण खांडेकर यांनी सांगितले.

दरम्यान, याबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी महेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित पाइपलाइनचा सध्या पुरवठा बंद केला असल्याचे सांगितले आहे. तरीही शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना त्याकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी मागणी होत आहे.